आपल्या दातांच्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि यासाठी योग्य टूथब्रशचा वापर हा एक महत्वाचा घटक आहे. दररोज दोन वेळा दात घासणं ही तोंडाच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त सवय असली तरी, तुम्ही वापरत असलेला टूथब्रश योग्य स्थितीत आहे का, याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांचा सल्ला:
डॉ. निशा ठक्कर, कॉस्मेटिक दंतचिकित्सक, डॉ. करिश्मा अॅस्थेटिक्स या क्लिनिकच्या सल्ल्यानुसार, टूथब्रशमधील ब्रिस्टल्सची रचना अशी असते की ती दातांमधील अन्नकण आणि प्लेक काढून टाकण्यास मदत करतात. मात्र, जेव्हा ब्रिस्टल्स जुने होतात, तेव्हा ते दातांची योग्य स्वच्छता करू शकत नाहीत. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचा आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
टूथब्रश बदलण्याचे नियम:
डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले की, दर दोन ते तीन महिन्यांनी टूथब्रश बदलणे आवश्यक आहे. यामुळे ब्रिस्टल्स प्रभावी राहतील आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य कार्य करतील.
टूथब्रशची खराब अवस्था:
तुमचा टूथब्रश दोन-तीन महिन्यांपूर्वीच खराब दिसू लागला, ब्रिस्टल्स वाकले किंवा तुटले, तर त्यावेळी नवीन टूथब्रश वापरणे आवश्यक आहे.
आजारपणानंतर टूथब्रश बदलणे:
डॉ. ठक्कर यांच्या मते, आजारपणानंतर, जंतूंचा प्रसार टाळण्यासाठी टूथब्रश बदलणे महत्त्वाचे आहे. यामुळे पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
हेही वाचा: लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
टूथब्रश नियमित बदलण्याचे फायदे:
- स्वच्छता: ताजे ब्रिस्टल्स प्लेक आणि अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी अधिक परिणामकारक असतात, ज्यामुळे तोंड स्वच्छ आणि निरोगी राहते.
- दुर्गंधी कमी होणे: तोंडातील स्वच्छता राखल्याने दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू कमी होतात आणि तोंडाला ताजेपणा येतो.
टूथब्रश नियमितपणे बदलण्याचे उपाय:
- दिनदर्शिकेवर खूण करा: दोन-तीन महिन्यांनी टूथब्रश बदलण्याची तारीख लक्षात ठेवण्यासाठी दिनदर्शिकेत खूण करा.
- जास्त टूथब्रश खरेदी करा: एकावेळी अनेक टूथब्रश खरेदी करा, ज्यामुळे वेळेवर टूथब्रश बदलणे सोपे होईल.
या सूचनांचे पालन करून तुम्ही तुमचे मौखिक आरोग्य चांगले ठेवू शकता आणि दातांच्या अनेक समस्यांपासून स्वत:चे रक्षण करू शकता.