लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे धीरज देशमुख यांच्यासाठी त्यांच्या बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. नुकतीच लातूरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत रितेशने आपल्या ‘लय भारी’ या चित्रपटातील आणि ‘बिग बॉस मराठी 5’चे विजेते सूरज चव्हाण यांचे डायलॉग्ज वापरून उपस्थितांची मने जिंकली.
रितेशने या सभेत आपल्या खुमासदार शैलीत भाषण करताना आपल्या बंधू धीरज देशमुख यांचं समर्थन करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. “आमचे धाकटे बंधू, लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज भैय्या.. लय भारी धीरज भैय्या! काल जो महिला मेळावा झाला, तेव्हाच विजय झाला. आता ही लीडची सभा आहे, तुमच्या कामाची ही पावती आहे,” असे रितेशने सांगत उपस्थितांच्या उत्साहात भर घातली.
झापूक झुपूक वारं आणि समोरचा धोका:
रितेशने पुढे बोलताना आपल्या खास शैलीत म्हटले, “गेल्या वेळी एक लाख मतांनी तुम्ही धीरज देशमुख यांना निवडून दिलं. धीरज नेहमी लोकांसाठी काम करतो. लोकांच्या वेदना कमी करायच्या आहेत, ही त्याची भावना आहे. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापूक झुपूक वारं आलंय. त्यामुळे काहीही काळजी करू नका, आता समोर गुलिगत धोका आहे.” या डायलॉगबाजीतून त्याने विरोधकांवर निशाणा साधला आणि जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.
सावध राहा, बटणावर टेंगूळ द्या!
रितेशने पुढे मतदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला. “सावधान राहा, त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचंच सरकार येणार. तुमचा पंजा भारी, सगळ्यांचा पंजा भारी! प्रत्येकाने गावात जा, बुथवर जा, अफवा आणि भूलथापा बाळगू नका, गाफील राहू नका,” असेही त्याने जोरदार आवाहन केले.
विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा:
“यावेळी एक लाखापेक्षा जास्त लीड हवी. रिक्वेस्ट करत नाही हा साहेब, आपला भाऊ म्हणून सांगतोय, गाफील राहू नका. मतदार यादी पहा, मतदान केंद्रावर घेवून या आणि मतदान करून घ्या. नंतर आपण धिंगाणा करू, विजयाचा गुळाला उधळू,” असे म्हणताना रितेशने आपल्या स्वर्गीय वडिलांना, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आठवले. “आज विलासराव साहेबांची खूप आठवण येतेय. त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे अमित भैय्या आणि धीरज आहेत. लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये मोठा विजयाचा रेकॉर्ड झाला पाहिजे,” असे म्हणत रितेशने मतदारांना एकजूट होण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीला समर्थन:
या प्रचारसभेच्या शेवटी रितेशने महाविकास आघाडीच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला. “तुमच्या मतांच्या ताकदीमुळेच आम्हाला यश मिळणार आहे. धीरजने आजवर जे काम केले, ते पाहता तुम्ही त्याला पुन्हा एकदा संधी द्याल याची मला खात्री आहे,” असे सांगत त्याने उपस्थितांना मत देण्याचे आवाहन केले.
रितेश देशमुखच्या या जोरदार भाषणाने लातूरकरांचा उत्साह वाढवला आणि धीरज देशमुख यांच्या प्रचाराला एक नवा जोश मिळाला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागणार? रुचिर शर्मा यांचे भाकित, “भारतातला इतिहास पाहता…”