चेन्नई येथे भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी खेळत असतानाच, अनंतपुरात दुलीप ट्रॉफी 2024 चे सामने रंगले आहेत. या स्पर्धेत भारताचे काही स्टार खेळाडूही खेळत आहेत. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, तिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, आणि आवेश खान यांसारखे भारतासाठी खेळलेले खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत. मात्र, या स्पर्धेत श्रेयस अय्यरची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अय्यर पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करत शून्यावर बाद झाला.
दुलीप ट्रॉफीतील पाचवा सामना इंडिया बी आणि इंडिया डी यांच्यात अनंतपुर येथे सुरू आहे. इंडिया डी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 105 धावांची सुरेख सलामी भागीदारी रचली. देवदत्त पडिक्कलने 95 चेंडूत 8 चौकारांसह 50 धावा केल्या, तर श्रीकर भरतने 105 चेंडूत 9 चौकारांसह 52 धावा केल्या. यानंतर रिकी भुईनेही मधल्या फळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरला यावेळीही निराशा पदरी पडली. त्याने 5 चेंडू खेळले आणि एकही धाव न करता बाद झाला. अय्यरला युवा गोलंदाज राहुल चहरने बाद केले. यामुळे अय्यरच्या खराब फॉर्मची मालिका सुरूच राहिली. त्याच्या सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद होण्याने भारतीय संघात पुनरागमनाच्या आशांनाही धक्का बसला आहे.
दुलीप ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मागील पाच डावांमध्ये अय्यरने फक्त 9, 54, 0, 41 आणि 0 धावा केल्या आहेत. सलग दोन वेळा शून्यावर परतल्यानंतर, चाहत्यांचा त्याच्यावर रोष वाढला आहे.
भारतीय निवड समिती देखील अय्यरच्या कामगिरीबद्दल समाधानी नसल्याचं म्हटलं जात आहे. या खराब कामगिरीमुळे श्रेयस अय्यरचं टीम इंडियात पुनरागमन आणखी कठीण झालं आहे.
हे ही वाचा -भारताच्या लाज राखणाऱ्या अश्विनचा शतकवीर खेळ, पहिल्या दिवशी भारत ६ बाद ३३९ धावांवर