बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका पुतण्यामध्ये सुरू असणारा राजकीय संघर्ष अजून वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना “बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं, बारामतीकर हे कायम पवार नावाच्या पाठीमागे उभे राहतात” असे विधान केलं होते . अजितदादांच्या या विधानाचा समाचार घेत ‘मूळचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये काहीतरी फरक आहे’ म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ तर सुनेत्रा पवार या विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला . शरद पवारांच्या विधानावर आता अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
पवारांनी केला समस्त सुनांचा अपमान!
अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या शरद पवार यांच्या वक्तव्यावरून शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात कारण महाराष्ट्र भूमी आहे तारा राणीची ,सावित्रीबाईंची,माँसाहेब जिजाबाईंची , या सगळ्या सुना होत्या आणि या सगळयांनी समाजासाठी काम केलं आहे हे सर्व आपणाला माहित आहेच. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले. बारामतीच्या काकांचं हे वाक्य, ‘महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करुन सासरी गेलेल्या सुनांचा अपमान’ आहे… सो कॉल्ड फुरोगामी…!!!’, असं ट्वीटमध्ये शितल म्हात्रे यांनी म्हटलं असून शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.
शितल म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले की, ”बाहेरुन’ आलेल्या सावित्री माई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या…’बाहेरुन’ आलेल्या येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या… अहो रमाईच्या संसारातल्या त्यागाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पुरुष घडत असतात…’. सुनेत्रा पवार या मूळ पवार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. इतकंच नाहीतर सुनेत्रा पवार मूळ पवार नसून त्या बाहेरच्या असल्याचे म्हटलंय. मूळ पवारांमध्ये फरक असंच विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार झाले धुतराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायर ब्रँड महिला नेत्या रूपाली पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करतानाच त्यांचा धृतराष्ट्र झाला असल्याचं म्हटलं आहे. “सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. ते काही सहजपणे शक्य होत नाही. त्यासाठी सासरी नांदायला आलेल्या त्या मुलीच्या आतड्याला कितीदा पीळ पडतो, माहेरच्या आठवणीने जीव किती तीळ तीळ तुटतो, कितीदा ती अश्रू ढाळते हे सासरी नांदायला आलेल्या मुलीला आणि तिला नांदायला पाठवणाऱ्या बापलाच कळू शकेल. अन्य कोणालाही नाही. शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे” अशी टीका पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
हे हि वाचा :शरद पवारांचे मोठे विधान