रशिया भारत ऑफर:
नवी दिल्ली – भारताच्या लढाऊ ताफ्यात सध्या कोणतेही बॉम्बर विमान नसल्याने रशियाने भारताला आपले सर्वात प्रगत Tu-160 व्हाईट स्वान बॉम्बर देण्याची ऑफर दिली आहे. जगातील सर्वात मोठे आणि वजनदार मानले जाणारे हे बॉम्बर चीन आणि पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. सध्या भारत या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा आहे.
1970 च्या दशकात सोव्हिएत काळातील तुपोलेव्ह डिझाईन ब्युरोने विकसित केलेले Tu-160 हे लांब पल्ल्याचे बॉम्बर 1980-90 दरम्यान रशियन हवाई दलात सामील करण्यात आले होते. हे बॉम्बर चार शक्तिशाली टर्बोजेट इंजिन्ससह सुसज्ज आहे, ज्यामुळे ते एका उड्डाणात तब्बल 12,300 किलोमीटर अंतर पार करू शकते. म्हणजेच, चीनमधील कोणत्याही शहरावर हल्ला करून परत येण्यासाठी हे विमान सक्षम आहे.
Tu-160 हे सुपरसॉनिक बॉम्बर असून ते ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने (ताशी 1,236 किमी) उड्डाण करू शकते. विमानात व्हेरिएबल स्वीप विंग्स आहेत, ज्यामुळे वेगवेगळ्या गती आणि मोहिमांसाठी कोन बदलता येतो. यामुळे ते जगातील सर्वात वेगवान बॉम्बर्सपैकी एक बनते.
खर्च आणि किंमत:
चार इंजिनमुळे या बॉम्बरच्या ऑपरेशनमध्ये प्रचंड इंधन खर्च होतो. अंदाजानुसार, इंधन, देखभाल आणि क्रू यासह, या विमानाच्या एका तासाच्या ऑपरेशनसाठी $19,000 ते $30,000 (सुमारे 15 ते 25 लाख रुपये) खर्च येऊ शकतो. तुलनेने, भारताकडे आधीच उपलब्ध असलेल्या फ्रेंच राफेलच्या ऑपरेशनचा तासाला फक्त $16,000 (सुमारे 13 लाख रुपये) खर्च येतो.
रशियाच्या Tu-160 बॉम्बरची किंमत सुमारे $300 दशलक्ष (25,33,58,47,770 रुपये) आहे, परंतु प्रशिक्षण, देखभाल आणि इतर उपकरणांसह एकूण खर्च $350 दशलक्षपर्यंत (29,55,00,00,000 रुपये) जाऊ शकतो.