24×7 Marathi

September 9, 2024

आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक मध्ये पुणे मागे

पुणे :

पुणे विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात ९५ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यात ९३ लाखांहून अधिक प्रवाशांनी देशांतर्गत आणि एक लाख ६९ हजार प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत पुणे देशात नवव्या स्थानी आहे, मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत पुण्याचा पहिला १० विमानतळांमध्येही समावेश नाही.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळनिहाय प्रवासी, उड्डाणे आणि मालवाहतुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीतील ही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरील देशांतर्गत फेऱ्यांची संख्या ६२ हजार ६१६ वर गेली. त्या आधीच्या वर्षात ही संख्या ५८ हजार २६१ होती. त्यात ७.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी देशांतर्गत प्रवाशांची संख्या ९३ लाख ५५ हजार ८५६ वर पोहोचली आहे. त्याआधीच्या वर्षात ही संख्या ७८ लाख ६५ हजार ६४४ होती. त्यात आता १८.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

पुणे विमानतळावरून गेल्या वर्षभरात एक हजार ४२३ आंतरराष्ट्रीय फेऱ्या झाल्या. त्याआधीच्या वर्षात ही संख्या एक हजार १९० होती. त्यात १९.६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या गेल्या वर्षी एक लाख ६९ हजार ६२८ वर पोहोचली. त्याआधीच्या वर्षात ती एक लाख ४१ हजार ५१६ होती. यंदा त्यात १९.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यातील एकूण हवाई प्रवासी संख्येत आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येच्या बाबतीत देशातील पहिल्या १० विमानतळांमध्येही पुण्याचा समावेश नाही. याच वेळी इतर अनेक छोटी शहरे पुण्याच्या पुढे आहेत.

मालवाहतुकीत घट

पुणे विमानतळावरील मालवाहतूक गेल्या वर्षी ३७ हजार ८४१ टन झाली आहे. त्याआधीच्या वर्षात मालवाहतूक ३९ हजार ३६९ होती. त्यात ३.९ टक्के घट नोंदविण्यात आली. पुणे विमानतळावरील देशांतर्गत मालवाहतूक ३७ हजार ८३३ टन आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केवळ आठ टन आहे. आधीच्या वर्षात ती ५५ टन होती.

हेही वाचा :

आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)
विमानतळ – आंतरराष्ट्रीय प्रवासी
दिल्ली – १ कोटी ९४ लाख ७० हजार
मुंबई – १ कोटी ४३ लाख १८ हजार
चेन्नई – ५८ लाख ७९ हजार
कोची – ४९ लाख २० हजार
बंगळुरू – ४६ लाख ६७ हजार
हैदराबाद – ४२ लाख १४ हजार
कालिकत – २६ लाख ७६ हजार
कोलकता – २४ लाख ६८ हजार
त्रिवेंद्रम – २० लाख ५० हजार
अहमदाबाद – १९ लाख ७७ हजार
पुणे – १ लाख ६९ हजार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top