पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट
अल्पवयीन आरोपीला आज पुन्हा नव्यानं पुणे पोलिसांनी (Pune Police) बालहक्क न्यायालयात हजर केलं. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला यापूर्वी कोर्टानं काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केलेला. त्यानंतर राज्यासह देशभरातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल केला असून पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कोर्टात नेमकं काय झाले ?
पुणे पोलिसांकडून कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं आहे. अपघातावेळी हा मुलगा दारू प्यायला होता, हे न्यायालयाला पटवून देण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत होते. पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात कलम 185 ची वाढ केली आहे. त्याद्वारे हा मुलगा दारुच्या नशेत होता, हे सांगण्याचा पुणे पोलीस न्यायालयासमोर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांकडून या अल्पवयीन मुलानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचं बील ज्युविनाईल कोर्टासमोर सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये या मुलानं दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर हा मुलगा दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून जुव्हीनाईल कोर्टात सादर करण्यात आलं आहे. मात्र, हा मुलगा दारू प्यायलेला होता की नाही, यासाठी सर्वात भक्कम पुरावा ब्लड सॅपलचाच मिळेल.
पुणे अल्पवयीन आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची बाजू मांडली. त्याच्या वकिलांची बाजू मांडल्यानंतर सरकारी वकीलांनी पोलिसांची बाजू मांडली. पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सरकरी वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपल्यानंतर साडेचार वाजता ज्युवीनाईल कोर्ट निर्णय देणार आहे.
यापूर्वी अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी नव्यानं 185 कलम दाखल करत आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलं आहे.
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालहक्क न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. आज पुन्हा नव्यानं त्याच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. यावेळी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये नव्यानं 185 कलम दाखल करण्यात आलं आहे. या कलमांतर्गत अल्पवयीन आरोपी दारू पिऊन तो वाहन चालवत होता आणि त्याचवेळी त्याच्या हातून अपघात झाला आहे, अशी तरतूद आहे.