सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये एका महिला खेळाडूने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिसऱ्या दिवशी सामान्य सेबर (तलवारबाजी) मॅचेस झाल्या. इजिप्त आणि युनायटेड स्टेट्समधील महिला खेळाडूंची वैयक्तिक सेबरमध्ये ‘टेबल ऑफ 32’ मॅच झाली. ही मॅच इजिप्तच्या खेळाडूने जिंकली. त्यानंतर इजिप्त आणि दक्षिण कोरिया यांच्यात ‘टेबल ऑफ 16’ मॅच झाली. या मॅचमध्ये इजिप्तच्या खेळाडूला दक्षिण कोरियाच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर, इजिप्शियन फेन्सर नादा हाफिजच्या इन्स्टाग्राम पोस्टने जगभर प्रसिद्धी मिळवली.
इजिप्त आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेली ‘टेबल ऑफ 16’ मॅच गमावल्यानंतर नादाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने सांगितलं की, ती सात महिन्यांची गरोदर आहे. मॅच झाल्यानंतर काही तासांनी, नादाने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “सात महिन्यांची गरोदर ऑलिम्पियन! तुम्हाला पोडियमवर दोन खेळाडू दिसत होते. पण, प्रत्यक्षात तिथे तिघीजणी होत्या! मी, माझी प्रतिस्पर्धी आणि जन्माला येणारी माझी मुलगी! मी आणि माझ्या बाळाने शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही आव्हानांना तोंड दिलं. गरोदरपणातील रोलरकोस्टर फारच कठीण आहे. जीवन आणि खेळ यांच्यातील संतुलन राखण्याची लढाई अत्यंत कठीण होती. पण, हे सर्व सार्थकी लागलं.”
पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल नादा हाफिजने पती आणि कुटुंबाचे आभार मानले. ती म्हणाली, “अंतिम 16 मध्ये स्थान मिळवता आलं याचा मला अभिमान आहे! हे सांगण्यासाठी मी पोस्ट करत आहे. मी नशिबवान आहे की, माझा पती आणि माझ्या कुटुंबियांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकले. हे स्पेशल ऑलिम्पिक थोडं वेगळं होतं. मी तीन वेळची ऑलिंपियन आहे. पण, यावेळेस एक लहानगी ऑलिंपियन माझ्यासोबत होती!”
नादा हाफिजने तिच्या पहिल्या लढतीमध्ये अमेरिकेच्या एलिझाबेथ टार्टाकोव्स्कीचा 15-13 असा पराभव केला होता. पण, दुसऱ्या मॅचमध्ये तिला कोरियाच्या जिओन ह्योंगकडून 7-15 असा पराभव पत्करावा लागला. नादाची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. पूर्वीच्या दोन स्पर्धांच्या तुलनेत यावर्षी तिने चांगली कामगिरी केली.