अपयशाच्या पहिल्या टप्प्यामुळे मोदींची जीभ घसरतेय – पृथ्वीराज चव्हाण

सोलापूर :

लोकसभा निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यात मतदानाचे आकडे खाली आल्यामुळे सर्व काही ठीक नाही, अशा अपयशाचा अंदाज आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीभ घसरली आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे विकासाचे मुद्दे सोडून द्वेषाचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सोलापुरात लोकसभेच्या प्रचारासाठी आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी, देशात भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशात भाजपला २०-२२ टक्क्यांवार मते मिळत नव्हती. २०१४ साली त्यांना ३१ टक्के मिळाली होती. नंतर २०१९ साली पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपला ३७ टक्के मते मिळाली होती. आता ती ३० टक्क्यांपर्यंत दिसतात. विरोधकांच्या मतांमध्ये म्हणजेच भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी होत गेल्यामुळे भाजापला सत्ता मिळत गेली. परंतु आता ही मतविभागणी टाळण्यात इंडिया आघाडी यशस्वी होत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. परंतु ‘वंचित’कडून स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेस न येता दुय्यम फळीतील नेत्यांना पाठविले गेले आणि या दुय्यम फळीतील नेत्यांची भाषा अपमानास्पद होती. जागा वाटपात त्यांच्या अव्यवाहार्य मागण्या मान्य करणे शक्य नव्हते. मागील २०१९ साली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र असताना त्यांना ७ टक्के मते मिळाली होती. त्यातून सोलापूरसह सात लोकसभा जागांवर भाजपविरोधी मतविभागणीचा महाविकास आघाडीला फटका बसला होता. परंतु आता त्यांच्यासोबत एमआयएम नाही. त्यामुळे ‘वंचित’च्या मतांचा टक्का तीनपर्यंत खाली येऊ शकतो, असे भाकितही चव्हाण यांनी वर्तविले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था अधोगतीला जात आहे. पूर्वीच्या डॉ. मनमोहन सिंग सरकारची दहा वर्षे आणि आताच्या मोदी सरकारच्या दहा वर्षांची तुलना केल्यास मनमोहन सिंग सरकारचा कार्यकाळ सरस ठरतो. मोदी सरकार पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या पाऊलवाटेने गेले असते तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची ठरली असती, हे जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून सांगता येईल, असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आले असता चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. त्यावेळी बोलताना आर्थिक मुद्यांवर मोदी सरकारच्या अपयशावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास देशाची लोकशाही, संविधान संपुष्टात येऊन हुकूमशाही, तानाशाही, ठोकशाही, डिक्टेटरशिप येण्याचा मोठा धोका आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी लादलेली दिसत असताना दुसरीकडे चुकीच्या आणि मनमानी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. मोदी यांचे अट्टाहासाने घेतलेले अनेक निर्णय देशाच्या अंगलट आले आहेत. निश्चलनीकरण (नोटाबंदी), जीएसटी, करोनाकाळात चार तासांची सूचना देऊन लादलेली टाळेबंदी व इतर निर्णय देशाला संकटाच्या खाईत ढकलणारे ठरले आहेत. शेतीविषयक कायदे लादण्याचा एकतर्फी प्रयत्न मोदी सरकारने केला असता शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून तीव्र आंदोलन केल्यामुळे नवीन शेती कायदा होऊ शकला नाही. परंतु देशातील शेतकरी मोदी सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे प्रचंड संकटात सापडले आहेत. शेतीमालाला कधी नव्हे तेव्हा चांगला भाव मिळाला की त्या शेतीमालावर निर्यातबंदी लादायची आणि शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडायचे, हा मोदी सरकारचा दिनक्रम ठरला आहे. म्हणूनच ४० रुपये किलो दराने विकला गेलेला कांदा ६ रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

२०१४ सालापर्यंत पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशावर ५५ लाख कोटींचे असलेले कर्ज मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात १९० लाख कोटींपर्यंत वाढले आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने उभारलेल्या अनेक उद्योग कंपन्या विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे. देशात नवीन उद्योग येत नाहीत. रोजगार निर्माण होत नाहीत. देशात आज ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत. दुसरीकडे ५० टक्के गरीब ६२ टक्के जीएसटी कर भरत आहेत. सरकारने पेट्रोलियम पदार्थातून ३२ लाख कोटींचा कर मिळविला आहे. तरीही ८० कोटी जनतेला दरमहा पाच किलो मोफत धान्य देण्याची वेळ येणे ही मोदी सरकारसाठी समृद्धतेचे लक्षण नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

हे हि वाचा:राष्ट्रवादी शरद पवार गटाचे साताऱ्याचे शिलेदार -शशिकांत शिंदे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top