ताप कमी करण्यासाठी अनेक घरांमध्ये थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर केला जातो. मात्र, सोशल मीडियावर नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओनुसार, लहान मुलांचा आणि प्रौढांचा ताप कमी करण्यासाठी ‘ओल्या सॉक्सचा’ वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, मुलांना थंड ओले मोजे घालायला लावावे आणि त्यावर कोरडे, लोकरीचे मोजे घालावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते, असं दावा करण्यात आला आहे. या पद्धतीनुसार, थंड मोजे घातल्याने रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर थंड मोजे गरम करण्यासाठी कार्य करत असल्याने ताप नैसर्गिकरित्या कमी होतो.
ओले सॉक्स वापरण्याचे फायदे (व्हिडिओनुसार):
- सुरक्षितपणे आणि नैसर्गिकरित्या ताप कमी होतो.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- रक्ताभिसरण सुधारते.
- आजारपणात चांगली झोप येण्यास मदत होते.
- औषधांची गरज भासत नाही.
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “हायड्रोथेरपी” या उपचार पद्धतीतून रक्तप्रवाह सुधारून आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून ताप प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. या पद्धतीचा आधार निसर्गोपचारावर आहे, ज्यामुळे शरीराची नैसर्गिक उपचार प्रक्रिया सक्रिय होते.
या दाव्यांची खात्री करण्यासाठी आम्ही डॉ. हरिचरण जी, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, ग्लेनेगल हॉस्पिटल्स, हैदराबाद यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते, “ओले सॉक्स वापरण्याचा हा एक घरगुती उपाय आहे. काही लोक ताप कमी करण्यासाठी हा उपाय वापरतात, ज्यात पातळ कापसाचे मोजे थंड पाण्यात भिजवून पिळून घेतले जातात आणि नंतर पायात घातले जातात. त्यावर कोरड्या लोकरीचे मोजे चढवले जातात. समर्थकांचा दावा आहे की, या पद्धतीमुळे ताप कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र, याच्या प्रभावीतेसाठी कोणताही वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही.”
डॉ. हरिचरण पुढे सांगतात की, “ताप हा मुख्यतः संसर्गामुळे होतो. ओले सॉक्स या पद्धतीसारखे घरगुती उपाय अल्पकालीन आराम देऊ शकतात, परंतु पारंपरिक वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. तापाची योग्य तपासणी आणि उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा: सतत टूथब्रश बदलणं गरजेचं आहे का? काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ..
सारांश:
ओले सॉक्स वापरणे हा एक घरगुती उपाय आहे, परंतु यासाठी वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे सतत ताप असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषत: लहान मुलांसाठी.