मुंबई:
महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे प्रत्येकी १५०० असे एकूण ३००० रुपये आधीच जमा करण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यातील तिसरा हफ्ता मिळण्यासाठी महिलांकडून सातत्याने विचारणा सुरू होती. अखेर सप्टेंबर महिन्याच्या हफ्त्याचे वितरण सुरू झाले आहे.
राज्य सरकारने २९ सप्टेंबर रोजी तिसऱ्या महिन्याच्या रकमेचे वितरण करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे आधीचे पैसे मिळाले नव्हते, त्यांना यावेळी तिन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २५ सप्टेंबर रोजी ३४.३४ लाख महिलांना १५४५.४७ कोटी रुपये, २६ सप्टेंबर रोजी ३८.९८ लाख महिलांना ५८४.८ कोटी रुपये, आणि २९ सप्टेंबर रोजी ३४.७४ लाख महिलांना ५२१ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. उर्वरित महिलांना देखील महिना संपण्यापूर्वी लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.