मुंबई :
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालाची उलटी गिनती सुरू झाली असून आता निकाल येण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा देशातील अशा एका लोकसभेच्या जागेवर लागल्या आहेत, जिथे एकाच कुटुंबातील दोन जण एकमेकांविरोधात निवडणूक लढले आहेत. महाराष्ट्रातील बारामती लोकसभा जागेवर वहिनी आणि नणंद यांच्यात लढत होत आहे. या जागेवर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. येथे कोण जिंकणार या प्रश्नावर एक्झिट पोलही विभागले गेले आहेत. काहींनी सुप्रिया यांचा वरचष्मा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी सुनेत्रा जिंकणार असल्याचे म्हटले आहे.
बारामती हे देशातील काही हाय प्रोफाईल जागांपैकी एक आहे. या जागेवरून शरद पवार दीर्घकाळ खासदार होते आणि त्यानंतर 2009 मध्ये त्यांची कन्या सुप्रिया सुळे इथल्या खासदार झाल्या. यंदाची निवडणूक सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक होती, कारण त्यांना खुद्द पवार कुटुंबातीलच एका व्यक्तीने आव्हान दिले होते.
गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. अनेक नाट्यमय घटना घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचे दोन तुकडे झाले. अजित पवार राज्याच्या सत्ताधारी महायुतीत सामील झाले. त्या नाट्याचा परिणाम आता लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या जागेवर दिसू लागला आहे. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक सभांमध्ये त्यांची वहिनी सुनेत्रावर त्यांनी गंभीर आरोप केले.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात त्यांचे वडील आणि पक्षप्रमुख शरद पवार स्वतः व्यस्त होते. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार आत्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत होते. गेल्या वर्षी अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंडखोरी केल्याने सहानुभूतीची लाट निर्माण झाली असून, त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी सुनेत्रा यांच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली.
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनीही नणंदला टक्कर देण्यासाठी कंबर कसली होती. निवडणुकीच्या काळात सुनेत्रा पवार यांचा दिवस सकाळी आठ वाजता सुरू होत होता. बारामतीतील प्रत्येक गावाला त्या भेटी देत, छोट्या-छोट्या बैठका घ्यायच्या आणि गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. प्रसार माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी कबुली दिली होती की, राजकारणात त्या नवीन आहेत, त्यामुळे लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यानां खूप मेहनत करावी लागणार आहे. अजित पवार यांनी पत्नीला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. सुनेत्रा पवार महाआघाडीत सामील झाल्याचा फायदा त्यांना होईल, असे अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे मत आहे.
या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा असून त्यापैकी दोन भाजपकडे, दोन काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या कांचन कूल यांचा १५५७७४ मतांनी पराभव केला होता.