24×7 Marathi

🍁पोरीचा बाप मरतो तेव्हा!

@लक्ष्मी यादव
भारतासारख्या पितृसत्ताक समाजात बाप नावाचा माणूस पोरीच्या आयुष्यात महत्वाचा आहे. पोरीला जन्म देण्यापेक्षा गर्भातच मारण्याचा विचार होतो तिथे तिला जन्म देण्यापासून ते माया, प्रेम देऊन शिक्षणानं सक्षम बनवण्यात बापाचा पुढाकार महत्वाचा असतो. (अशा निर्णयात आई सदानकदा गौणच असते. असून नसल्यासारखी!) बाप पोरगी आणि समाज यांच्यामध्ये पोरीला पाठीशी घालून उभा असतो. येणारे सगळे वार तो आपल्या अंगावर झेलत असतो. ज्या गाव देहातात पोरगी घराबाहेर पडली तरी सगळा समाज सीसीटीव्ही कॅमेरा बनून “तुमची पोरगी हे हे करते,” असे बापाला सांगतो तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे घालून“ मी माझ्या पोरीला ओळखतो, तुम्ही मला सांगू नका ती कशी आहे ते,” असं जेव्हा बाप सांगतो तेव्हा बापाचा अभिमान जिंकलेला असतो. पोरगी बापाचा गर्व असते. बाप कदाचित मुलीसमोर तिचं शब्दात कौतुक करत नसेलही पण सगळ्या गावासमोर तो आपल्या लेकीचं, तिच्या नोकरीचं, कर्तृत्वाचं, तिच्या संसाराचं गुणगान गात असतो. बापाची नजर लेकीच्या कौतुकानं ओतप्रोत भरलेली असते.

लेकीच्या विचारात बाप नेहमी सैरभैर असतो. तीची सुरक्षा, तिचा आनंद, तिची स्वप्नं याचा विचार सतत त्याच्या डोक्यात असतो. तो कधी दाखवत नाही त्याची ही अस्वस्थता, पण तिच्यासाठी तो सगळ्यांना कामाला लावतो. जगातील कोणत्याही माणसाशी तो लेकीसाठी भिडतो. तो लेकीची ढाल असतो. सासरी लेकीला त्रास असेल तर बापाचं काळीज कळवळतं आणि तो त्यांना नडतो. प्रसंगी तिला माहेरू घेऊन येतो, कायमची. पोरीचं सासर बापाच्या करड्या नजरेला दबकून असतंय.
बापाला लेक नेहमी भेटायला यावीशी वाटते. तिचं बापाच्या आसपास असणं त्याला दहा हत्तींचं बळ देत असतं. लेक माहेरी आली की बापाचं काळीज सुपाएवढं होतं. बाप आजारी असलातरी पोरीला पाहताच अनोख्या चैतन्यानं तो उल्हासित होतो.

गावाकडला बाप असेल तर लेकीसाठी तो रानातला पेरु विजारीच्या खिशात घालून आणल नाही तर बांधावरल्या आंब्याचा आंबा तरी. पाडाला आला नसला तरी. लेकीसाठी तो शेलके आंबे काढून पिकायला घालील; स्वत:ही खाणार नाही आणि इतर कुणालाही त्या आंब्यांना हात लावू देणार नाही. तसंही घरातल्यांना माहिती असतं ते लेकीसाठी आहेत. लेक आली रे आली की बाप काहीच न बोलता ते आंबे काढून लेकीसमोर ठेवेल. लेकही भूक नसेल तरी काहीच न बोलता ते आंबे खाईल आणि किती गोड आहेत हे कौतुकानं बापाला सांगेल. तेव्हा बापाच्या चेहर्‍यावर हे तेज, आनंद आणि समाधान दिसेल ते आणखी कुठे नाही दिसणार. लेक बापाचं काळीज असते.

कुणाचाही बाप गेल्यावर त्या लेकराला दु:ख होतं. साहजिकच ते! पण लेकीचं दुख: लई येगळं.

बाप जातो तेव्हा त्याच्यासोबत लेकपण जाते. लेकीची माया, तिला शोधणारी कौतुकाची नजर हरवते. लेकीची ढाल गायब होते. लेक उघडी पडते, अनाथ अन एकटी. ती आतून तुटून जाते. आजवर बाप सोबत असताना तिला हे जाणवलेलं नसतं; पण बाप गेल्यावर कळतं की आपण बापासाठी जगत होतो. लेकीला बाप गेल्यावर कळतं की बाप त्याच्यासोबत तिची जगण्याची प्रेरणा पण घेऊन गेला आहे. लेकीचं काळीज हरवतं. बाप गेलेल्या वर्षी झाडाचे आंबे पाड येण्याआधीच करपतात. लेक बापाने लावलेल्या पेरुच्या, आंब्याच्या झाडाकडं पाहायला लागली की तिचं डोळं आपसूक भरून येतात. जगातला प्रत्येक पेरु अन आंबा पोरीला बाप नसल्याची जाणीव करून देतो. आता तिला पेरु, आंबा आवडेनासा होतो. बाप तिची झाडं चोरून घेऊन जातो. बाप मरतो तेव्हा सगळं जग सोबत असूनही मनात उपरेपणाची भावना असते. आजवर बापासोबत जे जग जोडलेलं असतं ते एका क्षणात दुरावल्याची भावना होते. लेकीला बापाशिवाय आयुष्याची लढाई हरल्यासारखी वाटते. तिच्या आयुष्याचं ईप्सित गायब होतं.

बाप गेल्यावर लेकीबाळी पुन्हा पितृसत्ताक व्यवस्थेत अडकल्या जातात. त्यांची पावलं माहेरकडं वळत नाहीत. अनेकींची आई भावाच्या दयेवर, भाऊ वहिनीसोबत एकमताने असतो. बाप असताना पूर्ण वाटणाऱ्या आईमधील अर्धी आईही बाप सोबत घेऊन गेल्यासारखं वाटतं लेकीला. बापाच्या माघारी तिला कधी पूर्ण आई भेटत नाही. आई बापात एवढी मुरली होती हे कधी कळलेलं नसतं तिला. बाप जीवंत असताना निवांत राहणारी लेक दुसर्‍याच दिवशी परतून जायची लगबग करते. त्या घरची हक्काची लेक पाहुणी बनते. बाप गेल्यावर भाऊ बहिणीकडून हक्क सोडपत्र लिहून घेतो, पोर माहेरच्या कागदपत्रांवरून पण अदृश्य होते.

पोरीला आता गाव उपरा वाटू लागतो. बापाला रोज बघायची सवय लागलेली असते त्या ओक्याबोक्या घरात तिची नजर बापाला शोधत राहते. तिला बाप स्पष्ट दिसत असतो, घरभर फिरणारा, तिच्या आसपास वावरणारा. तिच्या लेकराशी बोलताना तिच्याकडे पाहणारा, ती रडताना स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिला’ रडू नको’ म्हणणारा, घरच्या गेटवर रोज कावळा बनून बसणारा. तो रोज दिसतो तिला, कशी स्वप्नात, कधी प्रत्यक्षात. तरी त्याला मनातलं दु:ख सांगता येत नाही, तिने आक्रंदून मारलेली हाक बापाला ऐकू जात नाही, त्याला दोन गोड घास चारता येत नाही याचं शल्य तिला होतं. बापाच्या जपून ठेवलेल्या सदर्‍यावरून हात फिरवताना तो आत असल्याचा तिला भास होतो आणि तिला अनावर होतं.

पोरगी ‘माझे बाबा नाहीत, वारले आहेत’ हे शब्द वापरू शकत नाही, असे शब्द कागदावर उतरवू शकत नाही. बाप सोडून ती विषयांतर करत राहते. इतरांचे बाप गेल्यावर त्यांना ती श्रद्धांजली वाहू शकत नाही. त्या तोकड्या शब्दात किती वेदना आहे हे तिला माहिती असतं.‘काळ हे औषध आहे,’ लोक बोलत राहतात. पण तिला तो कधी सरल्यासारखा वाटत नाही. बाप गेल्याची घटका तशीच आजच घडल्यासारखी असते. तिचे रोज वाहणारे अश्रूही गरम. बाप गेल्याच्या दिवशी जसे वाहिले होते तसेच. त्या दिवशी राजबिंडा बाप फक्त शांत झोपल्यासारखा दिसत असतो. हाक मारल्यावर उठून बसेल असा. पण तिने किती हाका मारलेल्या असतात त्याला, पण तो उठलेला नसतो. त्याच्या डोक्यावरून लेक हात फिरवत राहते, कपाळाचं चुंबन घेत राहते. बापाच्या कपाळाचं चुंबन घ्यायला त्याच्या मरणाचा दिवस उजाडावा लागला हे तिच्या ध्यानात येतं.

इतरांचे बाप पाहिल्यावर लेकीला ते जीवंत असल्याचं कोण दु:ख होतं. बापाच्या वयापेक्षा जास्त वयाचा आकडा असलेला बाप दिसला की “आपला बाप एवढी वर्षे का नाही जगला, जगूच शकला असता,” असं स्वतःशी बोलत राहते. आपल्या बापासाठी इतर लोक काहीतरी करताना दिसतानाचे क्षण ती पाहू शकत नाही. आपल्या बापासाठी काय काय करायचं राहून गेलं, काय काय ठरवलं होतं हे आठवून तिच्या ह्रदयात कळ उमटते. बाप जाणाराय हे आपल्याला कसं कळलं नाही असा विचार मनात येताच तिच्या ह्रदयात चर्र होतं.

मृत्यू अटळ आहे, हे समजणार्‍या तिला बाप कधीच मरू नये असं वाटत असतं. बाप मेल्यावर तिला सत्यवान सावित्रीची गोष्ट बाप लेकीची गोष्ट असावी असं वाटतं. आपल्याला ती जगता आली तर कसंही करून बापाला ती जीवंत करेल यावर तिचा ठाम विश्वास असतो. बापाला पूर्ण जगण्याआधी मरण आलं या विचारानं ती स्तब्ध होत राहते. दिवसभरातून शेकडो वेळा आणखी काही वर्षांसाठी तरी बाप जीवंत व्हावा असं मनोमन चिंतीत राहते. स्वर्गाची गोष्ट खरी असती तर आपणही जीवन झुगारून देऊन बापाला भेटलो असतो असंही लेकीला कित्येकदा वाटून जातं.

बाप जाण्याच्या धक्क्यात असतानाच भरीस भर म्हणून ज्या दिवशी पोरीचा बाप मरतो त्या क्षणापासून समाजातील ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक अंत्यविधी आणि त्यानंतरचे जवळजवळ सगळे विधी करण्याचे सगळे अधिकार मुलाला देतात आणि पोरीच्या पोरकेपणात भर पडते. एखाद दूसरा विधी पोरीच्या वाट्याला येतो, तोही ती पाहुणी आहे असं समजून. बापाचं मरणसुद्धा तिला ती पोरगी असल्याची जाणीव करून देतं.

गावाच्या वेशीवर बापाला श्रद्धांजली वाहिलेले बॅनर पाहिल्यावर लेकीचा श्वास गुदमरतो. गावाच्या वेशीतून जायचं तो टाळत राहते.

बाप गेल्यावर लेक निबर होऊन जाते. तिला कळतच नाही, ती भावनाहीन झाली आहे की सशक्त. बाप गेल्यावर लेक पुन्हा कधीच पूर्ववत होत नाही. तिचं निरागसपण आता कपाळावरील आटयांमध्ये, चेहर्‍यावरील सुरकुत्यात लपून बसतं. जीवातलं माणूस गेल्यावर लोक का मरत असतील हे आता पोरीला चांगलंच कळू लागतं.

बाप जातो तेव्हा लेकीचं लेकपण नेस्तनाबूत करून जातो.

पोरीचा बाप मरतो तेव्हा!

गाव लांबतं
घर पांगतं
अंगण ओस पडतं
ऊन पोरकं होतं
कुत्रं रडतं
गाई म्हशी गाभडतात
रान दुष्काळतं
पिकं करपतात
झाडं मोहोर गाळतात
वारा भरकटतो
माया विस्कटते
लोक हळहळतात
नाती भेगाळतात
भाऊ हरवतो
आई पानगळते
पोर एकटी होते

बापाचं जाणं
गजबजलेल्या माणसात
एक खुर्ची मुकी ओकीबोकी

बापाचं जाणं
सिझेरीयनची जखम
आयुष्यभर सलणारी

बाप मरताना एकटा जात नाही
पोरीचं पोरपण
लेकीचं माहेरपण
प्रवासी चिमणीचं गावपण
एका फुलपाखरांचं हसू
ओंजळीत घेऊन जातो
तिला पोरकी करून
कायमसाठी!

“तू तुझ्या बापावर गेलीय,” लोक म्हणायचे. पोर शोधत राहते बापाला तिच्या चेहऱ्यात, हातापायात आणि रक्तात. बाप दिसतो, पण गवसत नाही. ती हृदयावर हात ठेवते. बाप लेकीच्या हृदयात धडधडत असतोय. पोरीला एकच दुःख असतंय, बापाला काही केल्या मिठी मारता येत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top