आषाढी वारी 2024 निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आणि यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने आषाढी यात्रेसाठी तब्बल 5,000 विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
योजनेनुसार, गावातील 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष सवलतींची सेवा कायम
आषाढी यात्रा काळातही विविध सवलती लागू राहणार आहेत. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सवलत देणारी महिला सन्मान योजना आषाढी वारीतही लागू राहतील.
फुकट प्रवाशांवर नियंत्रण
यात्रा काळात तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. फुकट प्रवास रोखण्यासाठी 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी 24 तास नजर ठेवणार आहेत.
तात्पुरती बस स्थानके
प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत: चंद्रभागा, भिमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय कॉलेज). या बस स्थानकांवर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि मार्गदर्शन फलक उपलब्ध करून दिले जातील.
वाहतूक नियोजनासाठी एसटीची मदत
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक काम करणार आहेत.
राज्यभरातून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग, पंढरपूर आगार, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अमरावती प्रदेश, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत.
महामंडळ प्रशासनाने भाविकांना एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.