24×7 Marathi

September 9, 2024

आषाढी एकादशी: महत्त्व, पौराणिक कथा आणि चातुर्मासाचा आरंभ

आषाढ शुद्ध एकादशीला ‘महाएकादशी’ असे नाव आहे. याचप्रमाणे कार्तिकात येणारी एकदशी सुद्धा मोठी म्हणून गणली गेलेली आहे. आजपासून वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास (चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11 ला होतो व कार्तिक शुक्ल 11 ला चातुर्मास संपतो.) असे म्हणतात. म्हणून या एकादशीला वेगळे महत्त्व आहे. आषाढी एकादशी का साजरी केली जाते याविषयी तज्ज्ञ ज्योतिषी आकाश पुराणिक यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिलेली माहिती जाणून घेऊ. या एकादशीला ‘शयनी’ एकादशी असेही नाव आहे. ‘शयन’ म्हणजे झोप. या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात. या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला ‘परिवर्तनी एकादशी’ असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हणतात. आषाढ हा महिना पचन बिघडवणारा असतो म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तर्हेचे उपवास, नक्त, एकभुक्त, काही व्रत कैवल्ये ही उपवासाच्या दृष्टीने आयोजित केलेली आहेत. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात. हिंदु धर्मातील हा विज्ञानवादी दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ असा आहे. तो पाळण्याचा प्रयत्न केला तर प्रकृतीमान उत्तम राहते. या सणामागची पौराणिक कथा  ‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून ‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे त्यांना तीन दिवस झाले तरी बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले.

 चातुर्मास

या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वत:चे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. चातुर्मास हिंदू धर्मकल्पनांनुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चतुर्मास म्हणतात. मात्र, काहीजण चुकीने चातुर्मास असेही म्हणतात. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढी शुद्ध एकादशीने नाव पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे आहे. सूर्य मिथुन राशीत आल्यावर ही एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीचे नाव प्रबोधिनी एकादशी. या काळात हिंदू धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णु अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. 

आषाढी एकादशी 2024: तारीख, मुहूर्त, आणि पूजा विधी जाणून घ्या

 आषाढी एकादशी व पालखी सोहळा 

महाराष्ट्रतील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणाऱ्यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूरपर्यंत चालत नेतात. गळ्यात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top